संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त आज वाचन कट्ट्यावर त्यांना अभिवादन करण्यात आले. निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज (लेखक उद्धव रसाळे) या पुस्तकामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्या प्रस्तावनेचे अभिवाचन करण्यात आले. पु ल देशपांडे यांच्या खिल्ली (ऑडिओ बुक) या पुस्तकातील निवडक मजकूर डॉ. तुषार घोरपडे यांनी ऐकवला. त्यामध्ये राजकारण, राजकारणातले गुन्हेगारीकरण, आणि या सगळ्याला समाजाने मूक संमती देणे या गोष्टीवर घणाघात केलेला आहे. समाजात आजूबाजूला होणाऱ्या घटना, अस्मितांचे स्तोम, शैक्षणिक संकुलात होणारा गुंडांचा शिरकाव, त्याला हाताळण्यात त्या ठिकाणच्या पदाधिकार्यांना येणारे अपयश यबाबत चर्चा झाली. भोळे राहून चालणार नाही, हे संत गाडगेबाबांनी आपल्या अनोख्या शैलीत समजावले आहे. कारण भोळेपणाचा फायदा घेऊन राजकीय लाभ, आर्थिक लाभ (cyber crime इत्यादी), सामाजिक वर्चस्वाचे लाभ घेतले जातात. आपल्या सर्वांना हे ज्ञात असूनदेखील आपण त्याला बळी पडणे मूर्खपणाचे ठरेल, हाच संदेश आपण गाडगेबाबांकडून घेऊया.